राजगड | वार्ताहर
महेश सणस
पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यानिमित्त राजगड तालुक्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. २१ जानेवारी रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत नसरापूर ते वेल्हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केली आहे.
ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा एकूण ४३७ किलोमीटर अंतराची असून ती ४ टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. स्पर्धेमध्ये १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गामुळे राजगड तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मार्ग
दुसऱ्या टप्प्यात स्पर्धकांचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल :
पुणे – बोपदेव घाट – भिवरी – नारायणपूर – कापूरहोळ – कासुर्डी – दीडघर – करंजावणे – कुसगाव – खिंड – शिवापूर – डोणजे – पुणे.
वाहतुकीतील प्रमुख बदल व निर्बंध
स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे वाहतूक नियम लागू केले आहेत :
१) नसरापूर ते वेल्हे मार्ग
हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
२) वेल्हे ते नसरापूर दिशेने जाणारी वाहने
वेल्हे येथून नसरापूरकडे जाणारी वाहने करंजावणे येथे थांबवण्यात येतील.
३) अंतर्गत मार्गांवर बंदी
करंजावणे – वांगणी – निगडे – कुसगाव – शिवापूर हा मार्ग स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग
वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुण्याकडे येण्या-जाण्यासाठी नागरिकांनी पाबे घाट मार्ग किंवा पानशेत – कुरण बु. (कादवे खिंड) या मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, स्पर्धा शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे थेट प्रक्षेपण विविध वृत्तवाहिन्यांवरून करण्यात येणार आहे.







