भोर | प्रतिनिधी : तबरेज खान
भोर तालुक्यातील देवघर गावात गेल्या काही दिवसांपासून लाल तोंडाची आक्रमक मादी माकड लहान मुले व महिलांवर अंगावर धावून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले आणि घराबाहेर कामासाठी जाणाऱ्या महिलांना या माकडामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या घटनेची माहिती देवघर ग्रामस्थांनी तत्काळ वनरक्षक समीर जाधव यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता भोर वनविभागाने तातडीने पुणे येथील रेस्क्यू टीमची मदत घेतली. रेस्क्यू टीमने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने योग्य नियोजन करून सदर मादी माकडाला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या जेरबंद केले. माकड पकडल्यामुळे देवघर गावातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून भीतीचे वातावरण निवळले आहे.
या कारवाईनंतर वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांना महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्याही वन्यप्राण्यांना अन्न देऊ नये, त्यांच्याशी छेडछाड करू नये तसेच सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले. वन्यप्राण्यांना अन्न दिल्यास ते मानवी वस्तीकडे अधिक आकर्षित होतात व अशा आक्रमक घटनांची शक्यता वाढते, असेही वनविभागाने स्पष्ट केले.
देवघर गावात झालेल्या या संपूर्ण घटनेचा आढावा आय एम न्यूजचे रिपोर्टर तबरेज खान यांनी घेतला. वनविभागाची तातडीची कारवाई आणि रेस्क्यू टीमच्या कार्यक्षमतेमुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले आहेत. नागरिकांनीही वन्यप्राण्यांबाबत दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.








