खानापूर (वार्ताहर) : समीर कांबळे
खानापूर परिसरात आज रात्री घडलेल्या एका भीषण अपघातात तवे येथील संतोष थिकडे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष थिकडे हे खानापूर येथे आपल्या कामानिमित्त आले असताना MH-46 BU-2587 या मालवाहतूक गाडीला धडक बसून ते जखमी झाले. हा अपघात खानापूर पेट्रोल पंपाजवळ घडला असून काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच खानापूरचे पोलीस पाटील गणेश सपकाळ आणि संदीप सोळसकर यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने अपघातग्रस्त संतोष थिकडे यांना वाहनातून बाहेर काढले व प्राथमिक उपचारासाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना १०८ ॲम्बुलन्सद्वारे शहरातील रुग्णालयात रवाना करण्यात आले.

दरम्यान, या अपघातानंतर पुन्हा एकदा रिंग रोड परिसरातील वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या रिंग रोडचे काम वेगाने सुरू असल्याने, मोठे कंटेनर व मालवाहतूक गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्या जातात. या वाहनांवर ना रिफ्लेक्टर लावलेले असतात, ना इंडिकेटर सुरू ठेवलेले असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा कमी दृश्यमानतेत या गाड्या लक्षात न आल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला “या ठिकाणी रात्री प्रकाश व्यवस्था सुधारावी, रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंगवर निर्बंध आणावेत, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची गस्त वाढवावी” अशी मागणी केली आहे.
अपघातस्थळी हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस पाटील गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, तसेच काही स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, संतोष थिकडे यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती प्रतीक्षेत आहे.
> रिंग रोडवरील बेफिकीर पार्किंगमुळे नागरिकांचे जीव धोक्यात!
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.







