हिर्डोशी प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्यातील हिरडस मावळ परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिर्डोशी येथे शैक्षणिक सुविधांचा भक्कम पाया उभारण्यासाठी संगणक, सीसीटीव्ही, वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य तसेच शिवकालीन पुस्तके भेट देण्यात आली. ‘शैक्षणिक उठावा’ अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप धामुणसे, उपाध्यक्ष मीना धामुणसे, माजी अध्यक्ष अंकुश धामुणसे, सरपंच, उपसरपंच व पालकांच्या सहकार्याने उद्योजक मा. श्री. किरण गुजर, श्री. सुभाष शिर्के आणि श्री. ओक सर यांच्या वतीने ही मदत करण्यात आली.
विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, सुरक्षित शालेय वातावरण आणि अभ्यासाबरोबरच पूरक ज्ञान व वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने ही साधने उपलब्ध करून देण्यात आली. संगणकामुळे डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार असून सीसीटीव्हीमुळे शाळेच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे.
ग्रामस्थ व शाळेच्या वतीने मदत करणाऱ्या उद्योजकांचे आभार मानण्यात आले. तसेच दि. ९ रोजी शाळेत आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. या शैक्षणिक वर्षात शाळेने दोन लाख रुपयांहून अधिक रकमेचा शैक्षणिक उठाव केल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ. वैशाली वाबळे यांनी दिली.
दुर्गम भागात असूनही हिर्डोशी शाळा शैक्षणिकदृष्ट्या सातत्याने प्रगती करत गुणवत्तापूर्ण घडण घडवत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी (चाकण) संतोष कंक, सुनील भेलके, धोंडिबा मालुसरे, कोंडीबा धामुणसे, हनुमंत धामुणसे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापिका वैशाली वाबळे यांच्यासह पालकवर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







