आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

शिंदेवाडी परिसरात डंपरमधून कचरा टाकल्याचा प्रकार; ग्रामसेवकाची पोलिसात फिर्याद


भोर (नसरापूर वार्ताहर विलास धोंगडे)

 

भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी डंपरमधून ओला व दुर्गंधीयुक्त कचरा तसेच राडारोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणी ग्रामसेवक नवनाथ जनार्धन झोळ (वय 49, राहणार न-हे, पुणे) यांनी भोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास, आरोपी नागेश ज्योतीबा गोठ (रा. पाषाण, पुणे) आणि प्रकाश बाबु कांबळे (रा. बावधन, पुणे) यांनी संगनमत करून दोन डंपर — क्रमांक MH-12 HD 0122 आणि MH-14 GU 3003 — मधून शिंदेवाडी गावच्या हद्दीत, जुन्या पुणे-सातारा रस्त्यालगत, बेकायदेशीरपणे ओला व दुर्गंधीयुक्त कचरा तसेच बांधकामातील राडारोडा टाकला.

या कृतीमुळे परिसर प्रदूषित होऊन गावातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर अपायकारक परिणाम झाला आहे. ग्रामसेवक झोळ यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांत तक्रार दिली.

या प्रकरणाचा तपास सपोनि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस निरीक्षक गवळी हे प्रभारी अधिकारी आहेत. पोलिसांनी डंपर चालकांविरुद्ध सरकारी फिर्याद दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

पर्यावरण संवर्धनाबाबत शासन व स्थानिक प्रशासन वारंवार आवाहन करत असतानाही काही व्यक्ती बेकायदेशीररीत्या कचरा फेकून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

राजगड पोलिसांची तत्पर कारवाई; पर्यावरण संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची नागरिकांची मागणी


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!