माळेगाव (ता. भोर) – विलास धोंगडे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची दारे खुली व्हावीत, या हेतूने ‘श्री. भगवती सेवा आश्रम’, बाणेर, पुणे यांच्या माध्यमातून एक प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील डिजिटल प्रगतीस हातभार लावत श्रीमती शोभाताई आठवले व सौ. सीमाताई मोडक यांनी एक लाख रुपयांचा निधी देऊन विजय मुकुंदा आठवले विद्यालय, माळेगाव व कार्येकर शाळा, नसरापूर या शाळांना कॉम्प्युटर्स भेट दिले.
या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. माळेगाव व नसरापूर शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर करून शिकण्याची नवी दारे खुली झाली आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्याचा हा प्रयत्न सर्वार्थाने स्तुत्य ठरत आहे.
कॉम्प्युटर वितरण कार्यक्रमास नसरापूरचे माजी सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, डॉ. पुष्कर दलाल, गणेश पालकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व पालक समितीच्या सहकार्याने करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शोभाताई आठवले व सीमाताई मोडक यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “या कॉम्प्युटर्समुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ होईल.”
ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची बीजे रुजवणाऱ्या अशा समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ‘श्री. भगवती सेवा आश्रम’ यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही ज्ञानयात्रा ग्रामीण शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरूवात ठरत आहे.







