प्रतिनिधी विलास धोंडे, नसरापूर:
भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावात आज (दि. ८ नोव्हेंबर २०२५) दुपारी सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घराच्या बांधकामस्थळी डंपर पलटी होऊन पत्र्याच्या शेडवर आदळल्याने एका बालकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी श्री धोंडीबा रामभाऊ कचरे (वय २९, रा. कुरुंगवडी, ता. भोर) यांच्या घराच्या बांधकामाचे काम सुरू असताना एमएच १२ केपी २११८ क्रमांकाचा डंपर क्रश सॅन्ड घेऊन आला होता. सदर डंपरचा चालक अमरजित राजभर (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) हा डंपरमधून डंपिंग करत असताना निष्काळजीपणे वाहन चालविल्याने डंपर अचानक पलटी झाला.
या अपघातात डंपरमधील वाळू आणि लोखंडी पत्र्यांचे शेड कोसळून खाली असलेल्या भावजय आरती अशोक कचरे, पुतणी प्रियंका जगन्नाथ कचरे, पुतण्या श्लोक अशोक कचरे व लहानगा आलोक अशोक कचरे यांच्यावर आदळले. त्यामुळे आलोक अशोक कचरे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर तीन जणांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या आहेत.
अपघातामुळे घराच्या शेडचे मोठे नुकसान झाले असून गावामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोहवा अडवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादींच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोहवा अडवाल हे करत आहेत.
या अपघाताने कुरुंगवडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.










