भोर (पुणे) प्रतिनिधी : तबरेज खान
भोर-महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर वेणुपुरी गावाच्या हद्दीत सिमेंट मिक्सर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीत पलटी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटमार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामासाठी सिमेंट घेऊन जाणारा ट्रक रात्रीच्या सुमारास घाटमार्गाने जात होता. मात्र, वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रकचा तोल सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीत पलटी झाले.
घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी आणि कामगारांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरा क्रेन आणि जेसीबी मशीनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. या दरम्यान घाटातील रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना सुरक्षा उपाययोजनांची कमतरता असल्याने अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्रशासनाने खबरदारी घेऊन वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







