भोर (प्रतिनिधी) : तबरेज खान
भोर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (दि. १७ नोव्हेंबर) हा अंतिम दिवस अक्षरशः राजकीय मेळावा ठरला. दहा दिवस संथ गतीने सुरू असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया शेवटच्या दिवशी एवढ्या जोशातून पार पडली की संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. नगरपालिका इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर उमेदवार, कार्यकर्ते, ढोल-ताशे, बॅनर-झेंडे आणि घोषणांचा अखंड उत्साह दिसत होता.
निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ११५ अर्ज दाखल होऊन यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
भोर नगरपरिषद क्षेत्रात १ नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. अर्ज स्वीकृती १० नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. पहिल्या आठवड्यात केवळ १० अर्ज प्राप्त झाले होते, परंतु अंतिम दिवशी उमेदवारांनी प्रचंड उत्साहाने कार्यालयात धाव घेतली.
दोन प्रमुख पक्षांकडून शक्तीप्रदर्शन
सोमवारचा दिवस शहरात दोन मोठ्या मिरवणुकांमुळे विशेष गाजला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची मिरवणूक आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली भोर बसस्थानकातून निघाली. ढोल-ताशे, लेझीम पथके, नारळफोडी आणि घोषणांच्या गजरात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पक्ष यांची भव्य मिरवणूक माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थ चौपाटी परिसरातून निघाली. पक्ष कार्यकर्त्यांच्या निनादामुळे संपूर्ण भागात निवडणुकीचा उत्साह उसळला.
या दोन मिरवणुकांमुळे शहरातील राजकीय तापमान उचांकीवर पोहोचले होते. आता अर्ज छाननीपर्यंत संपूर्ण भोरमध्ये चर्चा फक्त निवडणुकीभोवतीच फिरताना दिसत आहे.
कोण-कोण मैदानात?
नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही प्रमुख पक्षांसह शिवसेना आणि अपक्ष उमेदवार अशा विविध पातळीवरून उमेदवारी दाखल झाली आहे —
भाजप :
संजय जगताप
नूतन जगताप
गणेश ज्ञानोबा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :
रामचंद्र (नाना) आवारे
ऋषभ रामचंद्र आवारे
शिवसेना :
नितीन सोनवले
अपक्ष :
कविता खोपडे
या सर्व उमेदवारांनी शहरभर शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने अंतिम दिवशी वातावरण अधिकच रंगले.
छाननी प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष
मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. कोणते अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे अर्ज बाद होतात, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. छाननीनंतर अधिकृत यादी जाहीर होताच प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
चुरशीची निवडणूक अनिवार्य
अंतिम दिवशी दाखल झालेल्या अर्जांच्या संख्येवरूनच भोर नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांत दिसत असलेली राजकीय हालचाल, प्रमुख पक्षांची मिरवणुके आणि उमेदवारांचा उत्साह यामुळे निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.










