भोर (प्रतिनिधी – विक्रम शिंदे), दि. १६ भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आयोजित पहिले १४० जणांचे प्रशिक्षण सत्र आज (दि.१६) गंगोत्री मंगल सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार डॉ. अरुण कदम, तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली जायगुडे (घोरपडे) उपस्थित होते. मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांना दृकश्राव्य माध्यमातून मतदान प्रक्रियेचे बारकावे, जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष दिवशी करावयाच्या कर्तव्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणात ईव्हीएम हाताळणी, मतदार पडताळणी, तक्रार निवारण, मतदान केंद्रांची व्यवस्था, तसेच निवडणुकीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचे नियम स्पष्ट करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्यासह विविध अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले.
यंदाची भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. शहरातील २२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यातील एका केंद्रावर पूर्णपणे महिला अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निर्णय अधिकारी वैशाली घोरपडे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन, मतदान सुरळीत पार पडणे आणि प्रशासनाची सर्व तयारी शिस्तबद्ध राहावी, यासाठी अधिकारी–कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने काम करावे, असे आवाहन प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले.
या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा दि. २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असून त्यातही प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह निवडणूक प्रक्रियेचे मार्गदर्शन केले जाईल.
भोर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून प्रशिक्षणातून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे चित्र दिसून आले.










