भोर प्रतिनिधी | तबरेज खान
भोर : मयूर खुंटे आत्महत्या प्रकरणाला अनेक दिवस उलटूनही या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) अनिल चव्हाण यांना अटक न झाल्याने भोर तालुक्यासह भोर–राजगड–हवेली परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजता भोर पोलीस स्टेशनसमोर समस्त आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष व संघटनांनी एकत्र येत घंटानाद आंदोलन केले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, मयूर खुंटे यांची हत्या झाल्यानंतर तपासाबाबत सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.आत्म हत्या प्रकरणात PSI अनिल चव्हाण यांचे नाव आरोपी म्हणून समोर येऊनही अद्याप त्यांना अटक न होणे, ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा थेट सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. “सामान्य आरोपी असता तर आतापर्यंत कारवाई झाली असती; मात्र आरोपी पोलिस अधिकारी असल्याने कायदा वेगळा का?” असा रोष आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आला.
शनिवारी झालेल्या घंटानाद आंदोलनात विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात घंटा व फलक घेऊन आंदोलकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “झोपेचे सोंग घेतलेल्या पोलीस प्रशासनास जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
आंदोलनादरम्यान काही काळ आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाहतूक ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. मात्र, या आंदोलनावर पोलिस उपअधीक्षकांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.
आंबेडकरी संघटनांच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात PSI अनिल चव्हाण यांना तात्काळ अटक करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे. तसेच, जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आगामी काळात खेड शिवापूर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन, मोठ्या प्रमाणात रास्ता रोको व जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे आता संपूर्ण तालुक्यात आणि परिसरात पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली असून, पुढील काळात प्रशासन कोणती ठोस व पारदर्शक कारवाई करते, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.










