आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

श्री संत सेवा संघाच्या २८ वर्षांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास उंबरे साधना केंद्रास १८ वर्षे


पू. संजयगुरुजी हे संत व श्रीशिवरायांनी दाखविलेल्या तेजस्वी व जीवनदर्शी मार्गावरून स्वतः मार्गक्रमण करीत, अनेकविध अभिनव उपक्रमांची रचना करीत श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी समर्पित भावनेने अध्यात्म क्षेत्रात ४० वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच व्यवसाय म्हणून १९८१ ते २००६ अशी २५ वर्षे प्रथितयश सिनेमोटोग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी कार्य केले.

 

शुद्ध बुद्धी आणि घरातील संस्कारित वातावरण यामुळे कोणतेही बेडेवाकडे, अश्लील, उत्तान चित्रीकरण केले नाही. अनेक समाजसेवी संस्था, अनाथालये यांच्या लघुपटांसाठी आपली गुणवत्ता समर्पित केली. संत, युगपुरुष, सामाजिक समस्या अशा विधायक विषयांवर चित्रपट, मालिका केल्या. त्यातून मिळणारा पैसा केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी न ठेवता विविध सामाजिक संस्थांना दान केला.

 

१९८६ साली त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. आध्यात्मिक साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या सद्गुरूंची प. पू. श्रीअरविंदनाथ महाराज रनाळकर गुरुजींची भेट झाली आणि मानवी जीवनात अध्यात्माची आवश्यकता समजली.

 

वैयक्तिक साधना करता करता समष्टी साधनेसाठी परात्पर गुरुजी प. पू. श्रीअरविंदनाथ महाराजांनी १९९० ते १९९६ अशी ६ वर्षे स्कूटर दिंडी काढली. या कालावधीत दिव्य भारतभूमीचे दर्शन-पूजन घडले, गुरुजींच्या मार्गदर्शनाने कठोर साधना घडली, ग्रंथांचा अभ्यास सुरु झाला. श्रीज्ञानदेवांनी सांगितलेल्या पंथराज कुंडलिनी योगातील अनेक दिव्य साक्षात्कार अनुभवले. तसेच भारतभूमीतील प्रदेश, व्यक्ती, विचारभिन्नता, परिस्थिती यांचाही प्रत्यय आला.

 

मानवी जीवन परिपूर्ण होण्यासाठी अध्यात्मच आवश्यक आहे हा अनुभव दृढ झाला आणि अशा स्थूल-सूक्ष्म अनुभवाद्वारे श्री संत सेवा संघ साकार झाला.

 

मुलांच्या मनात योग्य वयातच संस्कृती, तत्त्वज्ञान, संतविचार आणि शिवचरित्राविषयी प्रेम निर्माण झाले, त्यांनी त्याप्रमाणे आचरण केले तर आदर्श समाजाची निर्मिती होईल, या ध्येयातून संस्थेचे उपक्रम फुलले. श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीतुकारामगाथा, सकल संतवाङ्मय, छत्रपती श्रीशिवरायांचे चरित्र हे जीवनग्रंथ आहेत. ते केवळ वाचन, पारायण, पठन इतक्यापुरते सीमित न ठेवता सर्वांना त्यातील विचार देऊन आचरणास प्रवृत्त करण्याचे कार्य सुरु झाले.

 

यासाठी लहान व तरुणांना भावतील अशा २६ अभिनव उपक्रमांची रचना करण्यात आली. तरुणांना आवडेल अशा प्रभावी पद्धतीने अध्यात्मविचार रुजविले गेले. आजवर लाखो विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी संतविचारांचा परिसस्पर्श अनुभवला आहे. यामधून ७७०० ध्येयनिष्ठ ज्ञानसेवकांची एकसंध फळी उभी राहिली आहे.

 

पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर येथील साधना केंद्रे तसेच बुलडाणा, खामगाव, फलटण येथील संकल्पित साधन केंद्रांच्या माध्यमातून स्थावर उभारणी सुरु आहे.

 

२००६ साली कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून पू. गुरुजींनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. आपल्या घर, गाडी, सर्व मालमत्ता संस्थेच्या नावे करून व संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कार्यभार तरुण कार्यकर्त्यांकडे सोपविला. २५ वर्षे चित्रपटसृष्टीत निर्लेप राहून आणि अध्यात्म व चित्रपटसृष्टी या परस्परविरुद्ध क्षेत्रांत चोख राहून त्यांनी कर्तव्याचरणाचा आदर्श घालून दिला.

 

संस्थेच्या उपक्रमांतून आज अनेक निष्ठावान ज्ञानसेवक व्यासपीठावरून ज्ञानसेवा करीत आहेत. श्रीज्ञानेश्वरी पाठ्यक्रम परीक्षा, ओवी पाठांतर स्पर्धा, नि:शुल्क निवासी शिबिरे, चित्रमालिका, नृत्याविष्कार, ‘रामायण – आदर्श समाज’ नृत्यनाटिका, ‘तीर्थ शिवराय’ कार्यक्रम असे अनेक उपक्रम आजही सुरु आहेत.

 

तरुणांपर्यंत दिव्य ज्ञान पोहोचवण्यासाठी अनाहत स्टुडिओच्या माध्यमातून ग्रंथांचे ऑडिओबुक तयार करण्यात येत आहेत. सार्थ श्रीमद्भगवद्गीता व सार्थ श्रीज्ञानेश्वरीचे ऑडिओबुक प्रकाशित झाले आहे.

 

प्रदक्षिणा टूर्स, परिक्रमा टूर्सद्वारे इतिहास–अध्यात्म जागृतीचे कार्य होत आहे. गोवंश संवर्धनासाठी साताऱ्याजवळ गिरिधर गोशाळा स्थापन करण्यात आली आहे. पंचगव्याधारित औषधनिर्मितीतून आरोग्यसेवा दिली जात आहे.

 

भारतीय युद्धकलेचे प्रशिक्षण देणारे सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरूळ (कोल्हापूर) हे तरुणांना घडविणारे श्रेष्ठ केंद्र उभे राहिले आहे. तसेच श्रीमद्भागवत सृष्टी हा ९० कोटींचा भव्य प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे उभारला जात आहे.

 

संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण–शहरी भागातील ४२ शाखांतून ७,७०० तरुण ज्ञानसेवक नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळून सेवेत कार्यरत आहेत. कार्यमग्नता हेच जीवन मानून, वैयक्तिक जीवनाची उच्च रचना व राष्ट्रसेवेसाठी समर्पण हे सूत्र पू. गुरुजी पुढील पिढीत संक्रमित करीत आहेत.

 

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी, श्रीमद्भगवद्गीता, संतविचार सर्वांपर्यंत पोहोचावेत आणि जीवनव्रती तयार व्हावेत, या हेतुने श्री संत सेवा संघ २८ वर्षे अखंड कार्यरत आहे. पुणे, नाशिक, फलटण, शिरूर, कोल्हापूर, अहमदनगर, खंडाळा-बावडा, शिरपूर, अकोला-खामगाव-शेगांव, नागपूर अशा ठिकाणी अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते विविध उपक्रमांतून सेवा करीत आहेत.

 

भारत ही ऋषीमुनींची, संतांची, महापुरुषांची पवित्र भूमी आहे. विज्ञान जितके आवश्यक, तितकेच अध्यात्म आवश्यक असल्याचा विचार मांडत संस्था विविध प्रकल्पांतून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे. अन्न-वस्त्र-निवारा मिळाले तरी जीवन परिपूर्ण होत नाही; समाधान, शांतता आणि पावित्र्य संतविचारांतच आहे, यावर संस्था भर देत आहे.

 

समाजउन्नती व संस्कारवृद्धीसाठी संस्थेच्या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

—

 

उंबरे साधना केंद्रास १८ वर्षे

 

भोर तालुक्यातील उंबरे येथील ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी आध्यात्मिक साधना केंद्रात दरवर्षी हजारो विद्यार्थी येतात. यंदा ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त वर्षभर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!