भोर प्रतिनिधी : तबरेज खान
पंढरपूर–महाड राज्य महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या वडाच्या झाडाची तोड करत असताना झालेल्या अपघातात एका कामगाराला गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवार (दि. ५) रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात नितीन तानाजी पिलाणे (वय ३०, रा. महुडे बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंढरपूर–महाड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या अंतर्गत रस्त्यालगत असलेल्या मोठ्या व डेरेदार झाडांची तोड करण्यात येत आहे. भोर–रामबाग मार्गाच्या हद्दीत सुमारे २०० ते २५० वर्षे जुना, एकाच बुंध्यापासून फांद्या फुटलेला विशाल वडाचा वृक्ष तोडण्यात येत होता. सदर काम ठेकेदारामार्फत सुरू असताना नितीन पिलाणे हे क्रेनच्या बकेटमध्ये उभे राहून कटरच्या सहाय्याने झाडाची फांदी कापत होते.
दरम्यान, कापलेली फांदी कोसळण्याचा अंदाज न आल्याने ती थेट क्रेनच्या बकेटवर पडली. यामुळे बकेट तुटून नितीन पिलाणे रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याच दरम्यान मांढरदेवी व काळुबाई यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाहतूक या मार्गावर मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली.
घटनास्थळी बराच वेळ भोर पोलीस स्टेशनचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा धोकादायक कामांच्या वेळी योग्य सुरक्षितता उपाययोजना व पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










