प्रतिनिधी विलास धोंगडे नसरापुर
भोर तालुका : पारवडी गावातील एका कष्टकरी कुटुंबातील तरुणाने अग्निवीर म्हणून निवड मिळवत गावाचे नाव गौरवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, गरिबी आणि तुटपुंज्या साधनांमध्येही त्याने चिकाटी, परिश्रम आणि ठाम निश्चय यांच्या जोरावर यश मिळवले.

बनेश्वर मंदिराच्या साईडला असलेल्या मुलांच्या खेळण्याच्या जागेत त्याचे वडील लक्ष्मण लिमण व आई वैजयंता लक्ष्मण लिमण काम करीत. घरची आर्थिक अडचण मोठी असतानाही शिक्षण आणि भरतीची तयारी थांबू दिली नाही. दिवसभराच्या मजुरीनंतरही या तरुणाने याच जागेत धावण्याचा सराव, व्यायाम आणि शारीरिक तयारी सातत्याने केली.
त्याची शैक्षणिक कामगिरीही उल्लेखनीय आहे. दहावीमध्ये 68 टक्के आणि बारावीमध्ये 71 टक्के गुण मिळवून त्याने उत्तम कामगिरी सिद्ध केली. पुढे सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी त्याने बारामती येथील गुरुकुल ज्ञानसंकुल अकॅडमीत प्रवेश घेतला. येथे मा. श्री. विक्रम बोंद्रे सर यांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ लाभली. फक्त सहा महिन्यांच्या कठोर सराव, शिस्त आणि जिद्दीने त्याने अग्निवीर भरतीत यश मिळवले.
अग्निवीर म्हणून निवड होणे ही केवळ नोकरी नसून देशसेवेचे पवित्र कर्तव्य आहे. या तरुणाने केलेले प्रयत्न, त्याचे शौर्य आणि मातृभूमीवरील प्रेम यांनी संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.
पारवडी गावात या यशाचे स्वागत होत असून, इतर तरुणांसाठी त्याचे उदाहरण प्रेरणादायी ठरत आहे.










