किकवी येथे अल्पवयीन मुलावर ब्लेडने हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
भोर तालुक्यातील किकवी गावात भरदिवसा घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचशिलनगरकडे जाणाऱ्या पुलाजवळ खेळण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अडवून धमकी देत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किकवी येथील अमृत हरीश्चंद्र आहीरे यांचा मुलगा चैतन्य हा दि. ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास खेळण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालय किकवीकडे जात होता. त्यावेळी पंचशिलनगरकडे जाणाऱ्या पुलावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याला अडवले. “तुझं तोंड शांत ठेव, नाहीतर तुला मारून टाकीन,” अशी धमकी देत मुलाला हाताने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींपैकी एकाने ब्लेडने वार करून चैतन्यला दुखापत केली. शिवीगाळ व दमदाटी करत दोघेही आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून फरार झाले.
या घटनेत चैतन्य जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. भरदिवसा अल्पवयीन मुलावर झालेल्या या हल्ल्यामुळे किकवी गावासह संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास राजगड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. परिसरातील माहिती, नागरिकांचे जबाब व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.










