आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर–मांढरदेवी मार्गावर भीषण अपघात आंबाडखिंड घाटात चारचाकी ३० फूट दरीत कोसळली; स्थानिकांच्या तत्परतेमुळे प्रवासी बचावले


भोर – प्रतिनिधी : तबरेज खान

 

भोर–मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड घाट परिसरात सोमवारी (दि. १५) रात्री एक भीषण अपघात घडला. आंबाडे (ता. भोर) घाटाच्या प्रवेशद्वाराजवळील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मांढरदेवीकडे जाणारी चारचाकी कार थेट सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील प्रवासी गंभीर जखमी होण्यापासून बचावले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भोर येथून मांढरदेवीकडे निघालेली टाटा कंपनीची चारचाकी कार आंबाडे बसस्थानकाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याखालच्या खड्ड्यात कोसळली. वाहनात तीन ते चार प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच आंबाडे परिसरातील तरुणांनी कोणतीही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या धैर्याने कारमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले.

अपघातग्रस्त वाहनात एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

सध्या भोर–मांढरदेवी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून रस्ता पूर्वीपेक्षा चांगला व सुसाट झाला आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक वेगमर्यादा न पाळता बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच निष्काळजीपणामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

 

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने भोर–मांढरदेवी मार्गावर वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी, धोकादायक वळणांवर योग्य सूचना फलक व सुरक्षा व्यवस्था करावी तसेच बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!