आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वांगणीतील श्री. मळाई देवी यात्रेला पौष पौर्णिमेपासून प्रारंभ राज्यभरातून लाखो भाविकांची अपेक्षा; यात्रा नियोजन बैठक उत्साहात पार पडली


राजगड | प्रतिनिधी : राजेंद्र रणखांबे

राजगड तालुक्यातील वांगणी येथील श्री. मळाई देवीच्या प्रसिद्ध यात्रेला पौष पौर्णिमेपासून विधिवत प्रारंभ होत असून, या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मळाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने नुकतीच सविस्तर नियोजन बैठक पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या या यात्रेस दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात.

 

शिवकालीन इतिहास लाभलेल्या आणि जागृत देवस्थान म्हणून मान्यता असलेल्या श्री. मळाई देवीचे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार बाजीप्रभू देशपांडे यांचे कुलदैवत असल्याची परंपरा आहे. इतिहासात राजे शिवाजी महाराज स्वतः देवीच्या दर्शनासाठी येथे येत असत व दर्शनानंतरच पुढील मोहिमेस प्रस्थान करत, अशी श्रद्धा भाविकांमध्ये दृढ आहे. साधारण पंधरा दिवस चालणारी ही यात्रा परिसरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग मानली जाते.

खऱ्या अर्थाने पौष शुद्ध एकादशीपासून यात्रेचा प्रारंभ होतो. बुधवार, दि. 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता हनुमान मंदिरापासून मळाई देवी मंदिरापर्यंत ढोल-लेझीमच्या गजरात देवीची काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या दिवशी देवीच्या अभिषेकाचा मान परंपरेनुसार मारणे परिवाराला लाभतो. या सोहळ्यास वांगणी तसेच वांगणी वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

 

शुक्रवार, दि. 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता मळाई मंदिरातून देवीची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक निघणार असून, ही मिरवणूक वांगणी व वांगणी वाडी या दोन्ही गावांतून मार्गक्रमण करणार आहे. सोमवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचा मुख्य उत्सव साजरा केला जाणार आहे. पहाटे 5.30 ते 7.30 या वेळेत महाभिषेक, सकाळी 7.45 वाजता महाआरती, त्यानंतर 8 ते 9 या वेळेत होमहवन होणार आहे. दुपारी 4 वाजता चोळीपातळ मिरवणूक, तर रात्री 9 वाजता देवीचा छबीना मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. छबीन्यानंतर ज्योतिर्लिंग पालखी व मळाई देवी पालखी यांची भेट हा यात्रेतील विशेष क्षण मानला जातो.

 

यात्रा काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचाही बहर असणार आहे. रविवार, दि. 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता बायना शारदा सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल, तर दुपारी 3.30 वाजता ‘वांगणी वाडी केसरी’ कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे.

 

या नियोजन बैठकीस मळाई देवस्थानचे सर्व विश्वस्त, गावातील आजी-माजी पदाधिकारी तसेच वांगणी व वांगणी वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा काळात भाविकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता व सुव्यवस्थेसाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!