प्रतिनिधी : शिवम शिळीमकर नसरापूर
नसरापूर (ता. भोर) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर गावाशेजारी असलेल्या हातवे बुद्रुक येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गॅस लीकमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुनीता नंदकुमार गुरव यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील टीव्ही, फ्रिज, सोफा तसेच इतर जीवनावश्यक साहित्य आगीत नष्ट झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरामध्ये अचानक गॅस लीक झाल्याने आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, परिसरात अग्निशमन दल नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मोठा विलंब झाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच भागातील दीडघर गावातही गॅस लीकमुळे अशाच प्रकारची आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते. सलग दुसऱ्यांदा अशा घटना घडत असल्याने नसरापूर व हातवे बुद्रुक परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच भोर येथून तसेच पुण्याहून अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे.
नसरापूर व लगतच्या गावांमध्ये वाढती वस्ती, गॅस सिलेंडरचा वापर आणि वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता, नसरापूर परिसरात कायमस्वरूपी अग्निशमन दल तातडीने उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. वेळेत अग्निशमन दल उपलब्ध झाल्यास भविष्यात होणारी आर्थिक व जीवितहानी टाळता येईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.










