भोर प्रतिनिधी तबरेज खान
भोर : बुवासाहेबवाडी परिसरातून भोरच्या दिशेने रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणावर लाकूड वाहतूक होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. या मार्गावरून दररोज अवैधरीत्या लाकूड नेले जात असूनही संबंधित यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
रात्री उशिरा ट्रॅक्टरमधून मोठमोठे ओंडके भरून खुलेआम वाहतूक केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाकूड येतं तरी कुठून, असा प्रश्न निर्माण झाला असून जंगलातील वृक्षतोड सर्रास सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. वनविभागाचे लागेबांधे असल्याने ठोस कारवाई होत नाही म्हणूनच अवैध वृक्षतोडीचे धाडस वाढले आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही ठरावीक दिवसांत आणि ठरावीक वेळेतच ही वाहतूक होत असल्याने यामागे नियोजनबद्ध साखळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. ट्रॅक्टरमधून लाकूड नेले जात असताना कुठेही तपासणी होत नाही, ना पावत्यांची मागणी होते, ना वाहतुकीवर अडथळा आणला जातो. त्यामुळे वनविभागाची मेहरबानीच या अवैध व्यवसायाला संरक्षण देत असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकारामुळे जंगलसंपत्तीचा ऱ्हास होत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. वृक्षतोडीमुळे पावसाचे पाणी अडवण्याची क्षमता कमी होत आहे, माती धूप वाढत आहे आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. “आजून किती वृक्षतोड करणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
भोर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मोठ्या प्रमाणावर केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र जंगलांची खुलेआम लूट सुरू आहे. यावर तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर दंडात्मक पावले उचलावीत, रात्रीच्या वेळेत गस्त वाढवावी आणि अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
वनविभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून नेमके लाकूड कुठून येते, कोणाच्या परवानगीने वाहतूक होते आणि कोण जबाबदार आहे, याचा खुलासा करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास भविष्यात भोर तालुक्यासाठी गंभीर संकट ठरू शकतो.










