प्रतिनिधी : समीर कांबळे विंझर
वेल्हे : वंचित बहुजन आघाडी वेल्हे-राजगड तालुका कार्यकारिणीची निवड आणि संवाद बैठक नुकतीच वेल्हे येथील खरीव येथील बालाजी रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत बापू हनुमंत शिंदे यांची वेल्हे तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. याच बैठकीत आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाने निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीत तालुका स्तरावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महासचिव आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर बापू शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे वेल्हे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप रणखांबे आणि पुणे जिल्हा पश्चिमचे प्रवक्ते महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष संतोष लोखंडे, निरीक्षक उत्तम दादा वनशिव, सुनील कांबळे, राजू गायकवाड, उपाध्यक्ष महादेव खाटपे, संदीप कदम (मावळ तालुका युवक अध्यक्ष) यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्ष संतोष भाऊ लोखंडे, उत्तम दादा वनशिव, राजू गायकवाड आणि महादेव खाटपे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पुणे जिल्हा पश्चिमचे महासचिव अरुण कांबळे यांनी केले.
आगामी निवडणुकीची रणनीती
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर तात्काळ आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रणनिती आखण्यात आली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. वांगणी गणातून दिलीप उर्फ बंडू रणखांबे आणि बापू हनुमंत शिंदे यांनी उमेदवारीसाठी आपली तयारी दर्शवली आहे. इतर गणांमधील उमेदवारांची चाचपणी सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीच्या शेवटी नवनियुक्त तालुकाध्यक्ष बापू शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या नेतृत्वाखाली वेल्हे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे संघटन अधिक सक्षम आणि सक्रिय होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.







