भोर, दि. ९ : विलास धोंगडे नसरापूर
भोर तालुक्यातील कापूरहोळ गावात अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तब्बल ८० किलो कॉपर वायरची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे वीज विभागाला जवळपास ₹३२,००० रुपयांचे नुकसान झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी संजय उत्तम गोरड (वय ४४, रा. संगमनेर, ता. भोर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून ते ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत घडली. कापूरहोळ येथील राजयोग कॉम्प्लेक्सच्या मागे ओढ्याच्या कडेला उभारलेल्या विजेच्या पोलवरील ट्रान्सफॉर्मरचे तेल टँक अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून त्यातील तेल सांडले आणि ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायडिंग चोरून नेली.
या घटनेमुळे ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे निकामी झाला असून परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे अंमलदार पो.ह. मुंढे यांनी गुन्हा नोंदवला असून तपास पो.ह. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, ही चोरी पूर्वनियोजित असून चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचे तांबे वेगळे करून ते स्क्रॅप बाजारात विक्रीसाठी नेले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.
भोर पोलिस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







