आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेल्हे (राजगड) तालुका : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रंगत; महायुती-विरोधक आमने सामने!


वेल्हे (राजगड) प्रतिनिधी : समीर कांबळे

वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवारी, जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वावरून जोरदार हालचाली सुरू आहेत. तालुक्यातील सर्व प्रमुख पक्षांनी आपापल्या रणनीती आखत क्षेत्रातील समीकरणे घट्ट पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 

मायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाने सर्वाधिक जागांवर दावा केला असून निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. काही विद्यमान पदाधिकाऱ्यांना मागे टाकत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्याने काही गटांत नाराजीचे सूरही उमटताना दिसत आहेत.

 

शिवसेना शिंदे गटाने देखील पारंपरिक बालेकिल्ल्यांवर हक्क सांगत सरकारी योजनांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे. तर जागा न मिळाल्यास काही गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. भाजपने संघटन मजबूत करण्यासाठी तालुक्यात तयारी वाढवली असून किमान दोन ते तीन जागांवर उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील स्थानिक कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

 

दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीही जोरदार तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी जुने पदाधिकारी व नव्या कार्यकर्त्यांची योग्य सांगड घालत निवडणुकीत मजबुतीने उतरण्याची तयारी दाखवली आहे. काही प्रभावशाली नेत्यांना आपल्या गटात सामील करण्याचे प्रयत्न सुरू असून तालुक्यातील राजकारणात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

शिवसेना ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर व सध्याच्या ‘मशाल’ चिन्हावर भर देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. मात्र काही प्रमुख ठिकाणी बंडखोरीची शक्यता असल्याची कुजबुज असून स्थानिक गट-तटामुळे असंतोष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही प्रभावशाली नेते कोणत्या गटात जाणार याबाबत तालुक्यात मोठी चर्चा असून या प्रवेशामुळे राजकीय गणिते बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुढील निवडणुकीत तरुण, सुशिक्षित आणि स्थानिक प्रश्नांवर धार असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची तयारी सर्वच पक्षांनी दर्शवली आहे.

 

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत वेल्हे तालुक्यात तुल्यबळ लढत होणार असून कोणता पक्ष स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी समन्वय साधतो आणि योग्य उमेदवारांची निवड करतो त्याची बाजू अधिक मजबूत ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!