भोर प्रतिनिधी : तबरेज खान
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथील आदिवासी कातकरी समाजातील ३७ घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या पक्क्या घरांमुळे दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या कातकरी कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाचं निवासस्थान मिळालं आहे.

या घरकुलांच्या उभारणीसाठी रोटरी क्लब, परम निश्चय फाउंडेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी विविध बांधकाम साहित्य उपलब्ध करून देत मोलाचं सहकार्य केलं. घरकुलांची कामं पूर्ण झाल्याने संपूर्ण कातकरी आदिवासी वस्तीचा कायापालट झाल्याचं चित्र दिसून येत असून, हक्काचं पक्कं घर मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे जाणवतो.
यावेळी दैनिकाशी बोलताना सीईओ गजानन पाटील म्हणाले, “प्रधानमंत्री जनमन आवास योजना ही केवळ घर बांधणीपुरती मर्यादित नसून, आदिवासी कुटुंबांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवणारी योजना आहे. वडगाव डाळ येथे पूर्ण झालेल्या घरकुलांमुळे कातकरी समाजाला सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “भोर तालुक्यातील इतर ३३ कातकरी वस्त्यांमध्येही याच धर्तीवर घरकुलांची कामं सुरू आहेत. संबंधित विभाग, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर संस्थांच्या समन्वयातून ही कामं वेगाने पूर्ण करून, लवकरच उर्वरित घरकुलांचं लोकार्पण केलं जाईल.”
कार्यक्रमावेळी स्थानिक अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी कुटुंबांसाठी पक्क्या घरांची ही मोहीम सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल असल्याचं यावेळी उपस्थितांनी नमूद केलं.







