आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वरंधा घाटातील शिरगाव येथे रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सांबरांचा मृत्यू


भोर प्रतिनिधी : तबरेज खान

वरंधा घाट परिसरातील शिरगाव (ता. भोर) येथील नीरा देवघर धरणाच्या बॅकवॉटरजवळ, श्री जननीदेवी मंदिर परिसरात रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सांबर मृतावस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वनविभागाने शनिवारी (दि. २७) दुपारी तीन वाजता दोन्ही सांबरांवर अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

 

मौजे शिरगाव हद्दीत नीरा देवघर रिंग रोडलगत धरणाच्या काठावर श्री जननीमाता मंदिराचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात काम करणाऱ्या कामगारांना तसेच ग्रामस्थांना शुक्रवारी (दि. २६) दोन सांबर मृत अवस्थेत दिसून आली. ही बाब तात्काळ ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश पोळ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सरपंचांनी रात्री सुमारे नऊ वाजता ही माहिती संबंधितांना दिल्यानंतर विलास मादगुडे यांनी हिर्डोशी वनविभागाचे वनपाल रोहन इंगवले यांना घटनेची खबर दिली.

 

रात्रीचा वेळ असल्याने वनविभागाने शनिवारी सकाळी घटनास्थळी पाहणी केली. वनरक्षक तुकाराम बादणे आणि मजूर भाऊ शिरवले यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, एक सांबर पाण्यात तर दुसरे धरणाच्या काठावर मृत अवस्थेत आढळून आले. प्राथमिक पाहणीत रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यातच या सांबरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, दहा ते पंधरा रानटी कुत्र्यांनी एका सांबराचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले होते. वनविभागाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही सांबरांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर लाकडाचे सरण रचून वनविभागाकडून अग्नी देत त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

 

या घटनेमुळे नीरा देवघर धरण परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रानटी कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!