सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत विकासासाठी युवक – पाणलोट क्षेत्र व पडीक जमिनी व्यवस्थापन” या विषयांतर्गत दि. १३ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत पालखुर्द (ता. राजगड, जि. पुणे) येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर उत्साहात पार पडले.
या विशेष शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी श्रमदानासह विविध समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. गाव स्वच्छता मोहीम, राजगड किल्ला परिसराची स्वच्छता, प्लास्टिक कचरा संकलन, गुंजवणी नदीवर वनराई बंधारा उभारणी, पडीक जमिनी व्यवस्थापन, प्रभातफेरीद्वारे जनजागृती, पथनाट्य सादरीकरण, कृषी पर्यटन क्षेत्र भेट तसेच विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली.
शिबिरादरम्यान शाश्वत शेती, राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका, लेह-लडाख प्रवास अनुभव, नंदनवन कृषी पर्यटन आणि राजगड किल्ला संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संक्रांतीच्या दिवशी गावातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या शिबिरासाठी श्री. योगेश दरडीघे (पोलीस पाटील, पालखुर्द), श्री. शिवाजी दरडीघे व श्री. पांडुरंग दरडीघे यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिराचे उद्घाटन अमृतेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लाटे यांच्या हस्ते झाले, तर समारोप प्रसंगी पाली गावच्या सरपंच सौ. निता किरण खाटपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ. जगदीश शेवते, प्रा. दयानंद जाधवर, प्रा. वैष्णवी कोंडे, प्रा. अंकिता महांगरे, अभिषेक मोरे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वीपणे पार पाडले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना व श्रमप्रतिष्ठा अधिक दृढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.










