आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुरुजींच्या मायेची अनोखी ऊब मायेची ऊब व ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्रचा प्रेरणादायी उपक्रम


 

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षीही इस्रो, नासा यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटी घडवून आणण्याचा उपक्रम राबविला जाणार असून, राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली स्वप्ने साकार करावीत, असे आवाहन पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल पलांडे यांनी केले.

मायेची ऊब फाऊंडेशन, शिरूर व ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमांतर्गत राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द, भूरुकवाडी, भट्टी, वाघदरा, सिंगापूर व शेनवड या गावांमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच ध्येय प्रकाशन यांच्या शैक्षणिक स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या.

शिष्यवृत्ती परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये अधिकाधिक यश मिळावे, यासाठी ध्येय प्रकाशन बालभारती मान्यताप्राप्त मार्गदर्शक पुस्तिका शिक्षकांना देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास अनिल पलांडे यांनी व्यक्त केला.

यावेळी ध्येय प्रकाशन यांच्या वतीने सुरेश गडदे सर व संदीप कोतवाल सर यांना सन्मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिरूर तालुक्यातील राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा पिंपरी दुमाला येथील मुख्याध्यापक राहुल चातुर गुरुजी यांच्या संकल्पनेतून मायेची ऊब फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम यंदा अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. तसेच सुदाम शेंडगे सर व सोमनाथ शिंदे सर यांच्या संकल्पनेतून ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र दरवर्षी जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोंढावळे खुर्दचे मुख्याध्यापक गणेश सांडभोर सर यांनी केले, तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण खोपडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन महिला मंडळ व ग्रामस्थांनी केले.

या प्रसंगी मिडास अँटोसॉफ्ट इंजि. प्रा. लि.चे नवनाथ थिटे, वेल्हे केंद्रप्रमुख सुजाता काशीद, पासली केंद्रप्रमुख बाळासाहेब शेख, खादी ग्रामोद्योग महामंडळ पुणेचे चेअरमन दिपक रायकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष युवराज थोरात, शिरूर तालुका अध्यक्ष कल्याण कोकाटे, राजगड तालुका अध्यक्ष रवींद्र कोहिनकर, शिक्षक भारती पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भावळेकर, भरत जगदाळे, पी.एम. श्री. शाळेचे मुख्याध्यापक भरत शेंडकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तानाजी भोसले, खानापूर पोलीस पाटील गणेश सपकाळ, कोंढावळे पोलीस पाटील रेणुका खोपडे, उल्हास भुरूक, संतोष देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी विशेष कौतुक केले.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!