विंझर प्रतिनिधी समीर कांबळे
राजगड-तोरणा (ता. राजगड) : नववर्षाच्या जल्लोषाला शिस्त, संवेदनशीलता आणि इतिहासाची जाणीव देण्यासाठी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्यभर एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल २४३ गडकिल्ल्यांवर एकाचवेळी ‘खडा पहारा’ ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये राजगड तालुक्यातील ऐतिहासिक राजगड आणि तोरणा किल्ल्यांचा समावेश आहे.
राजगड व तोरणा किल्ले हे केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची जिवंत स्मारके आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत नववर्षाच्या काळात किल्ल्यांवर होणारे मद्यपान, तोडफोड, असभ्य वर्तन, गैरप्रकार तसेच प्लास्टिक कचऱ्याचा वाढता उपद्रव गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी ‘खडा पहारा’ मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत राजगड व तोरणा किल्ल्यांच्या पायथ्यांवर संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्रभर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिवप्रेमी व स्वयंसेवक तैनात राहणार असून, किल्ल्यावर प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची तपासणी केली जाणार आहे. मद्य, धूम्रपान जन्य वस्तू किंवा प्लास्टिक, कचरा आढळल्यास तो किल्ल्यावर नेण्यास सक्त मनाई करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
“ही मोहीम पोलीस प्रशासन, वनविभाग तसेच राज्य पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने राबविली जाणार असून प्रत्येक गडकिल्ल्यावर शिस्तबद्ध पद्धतीने पहारा ठेवण्यात येणार असून, संशयास्पद किंवा नियमबाह्य प्रकार आढळल्यास त्वरित कार्यवाही केली जाईल.” – अभिषेक नवले, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, पुणे विभाग प्रतिनिधी.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटक व नागरिकांमध्ये जनजागृती करून गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्याविषयीची जबाबदारी अधोरेखित केली जाणार आहे. गडकिल्ल्यांचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक जागरूक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे, असा ठाम संदेश ‘खडा पहारा’ मोहिमेतून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नववर्ष साजरे करताना ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखला जाईल आणि भावी पिढ्यांसाठी महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.







