आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

हास्य-विनोदातून समाजप्रबोधन आणि संविधान मूल्यांची जाणीव : ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न


 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शंकरराव भेलके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’मध्ये हास्य-विनोदातून समाजप्रबोधन तसेच भारतीय संविधानाचे मूल्य व सद्यस्थिती यांवर सखोल विचारमंथन झाले. या व्याख्यानमालेत प्रसिद्ध सिने अभिनेते व ज्येष्ठ कलाकार गजानन पातुरकर आणि अभ्यासक प्रा. विशाल फलके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे होते.

 

“आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक युगात माणूस हसणे विसरत चालला आहे. हसण्यामुळे केवळ मन प्रसन्न राहत नाही, तर शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. विनोदाच्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट थेट लोकांच्या काळजाला भिडते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन घडते,” असे प्रतिपादन गजानन पातुरकर यांनी ‘हास्य-विनोदातून समाजप्रबोधन’ या विषयावरील व्याख्यानात केले. वाचन व शिक्षणातील आनंदावर भर देताना त्यांनी, “पुस्तकाचे प्रत्येक पान माणसाचे चारित्र्य घडवते. पोटभर हसा, पोटभर पाणी प्या, मनापासून दाद द्या, टाळ्या वाजवा; जीवनातील प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा,” असा सकारात्मक संदेश दिला.

यानंतर ‘भारतीय संविधान आणि सद्यस्थिती’ या विषयावर बोलताना प्रा. विशाल फलके यांनी संविधानाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. “संविधानामुळेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मान मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेल्या स्वातंत्र्याच्या मुहूर्तमेढीला घटनात्मक रूप देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले,” असे त्यांनी नमूद केले. स्त्रीस्वातंत्र्य, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या विरोधातील कायदे, मतदानाचा अधिकार व माहितीचा अधिकार ही संविधानाची मोठी फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकशाहीच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना प्रा. फलके म्हणाले की, आज लोकशाही राजेशाहीकडे झुकत असल्याची भीती निर्माण होत आहे. संविधानात मोडतोडीचे प्रयत्न, माध्यमांची भूमिका आणि खोट्या माहितीचा मारा या मुद्द्यांवर त्यांनी परखड भाष्य केले. “हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव होण्यासाठी प्रत्येकाने संविधानाचे सखोल वाचन करणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

 

अध्यक्षीय मनोगतात डॉ. तुषार शितोळे यांनी दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव विसरून हसून-हसवून जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “संविधान ही केवळ पुस्तकी संहिता नसून आपली जीवनपद्धती आहे; त्यातील मूल्ये आचरणात आणली पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जगदीश शेवते व प्रा. अंकिता महांगरे यांनी केले. आभार प्रा. माऊली कोंडे व प्रा. जीवन गायकवाड यांनी मानले. यावेळी डॉ. रोहिदास ढाकणे, ग्रंथपाल प्रा. भगवान गावित, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. दयानंद जाधवर, प्रा. महेश कोळपे, प्रा. अंकिता महांगरे, सुमित कांबळे, अभिषेक मोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!