भोर (प्रतिनिधी तबरेज खान ): आगामी भोर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत चुरस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ने भारतीय जनता पक्षाकडे एका जागेची मागणी केली असून, ही मागणी मान्य न झाल्यास स्वबळावर निवडणुकीचा पर्याय खुला ठेवण्याचा इशारा भोर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिला आहे.
सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आरपीआय (आठवले) हा महायुतीतील जुना, विश्वासू आणि निष्ठावंत मित्र पक्ष आहे. त्यामुळे जुन्या साथीदारांना डावलणे योग्य नाही. आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर न्यायासाठी लढत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आजवर आम्ही लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली नाही. मात्र, या वेळी नगरपालिका निवडणुकीत एक राखीव जागा आम्हाला दिली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला नवखे समजू नये; कारण महायुतीचा पाया रचला गेला तेव्हाच आमचा पक्ष त्याचा घटक होता.”
सावंत यांनी भाजप नेत्यांना सूचित करत म्हटले की, जुने आणि निष्ठावंत सहकारी यांचा सन्मान राखणे हे राजकारणातील परिपक्वतेचे लक्षण आहे. “जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही, तर आरपीआय (आठवले) स्वबळावर निवडणूक लढवेल किंवा तटस्थ भूमिकाही स्वीकारेल. परंतु आमचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत गमावला जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले की, “महायुतीतील आमच्या न्याय्य मागणीची दखल घेऊन ती समाजापर्यंत पोहोचवावी,” असे ते म्हणाले.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत आता राजकीय समीकरणांना नवा कलाटणीबिंदू मिळू शकतो. महायुतीतील जुन्या मित्र पक्षाची अशी ठाम मागणी ही केवळ एका जागेपुरती नसून, ती सहकार्य आणि सन्मानाच्या राजकारणाची चाचणी ठरू शकते. भाजपने ही मागणी मान्य केली, तर एकजूट टिकेल; अन्यथा स्थानिक राजकारणात नवी समीकरणे उभी राहतील, यात शंका नाही.










