भोर तालुक्यातील वेळु गावाच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर राजगड पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत फिरोज निजाम शेख (वय ३८, रा. वेळु, ता. भोर, जि. पुणे) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून १० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.
दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मौजे वेळु गावच्या हद्दीत एस. एम. पी. कंपनीच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाखाली आरोपी हा आपल्या ओळखीच्या लोकांना बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीनुसार राजगड पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले.
छाप्यादरम्यान आरोपीकडून पिवळ्या रंगाचा ३५ लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक कॅन, त्यामध्ये अंदाजे १० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, तसेच एक निळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा ग्लास असा एकूण १,००५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा अवैधरीत्या दारू विक्री करून सामाजिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.
दरम्यान, या कारवाईत फिर्यादी पोलीस हवालदार अमोल शेडगे यांच्या कार्यशैलीचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. याआधीही त्यांनी अवैध दारूविक्री व तत्सम बेकायदेशीर धंद्यांविरोधात ठोस आणि प्रभावी कारवाया केल्या असून, यापुढेही अशाच प्रकारच्या धाडसी कारवाया सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
भोर तालुका तसेच पुणे–सातारा महामार्ग परिसरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. विशेषतः हायवे पट्ट्यामध्ये अवैध दारूविक्री, तस्करी तसेच इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. यामुळे तरुण पिढी व सर्वसामान्य नागरिकांवर विपरीत परिणाम होत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
त्यामुळे राजगड पोलिसांनी हायवे पट्ट्यातील तसेच तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वेळु येथील ही कारवाई कौतुकास्पद असून अशाच सातत्यपूर्ण कारवायांमधून अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







