आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी — भाजपा युवा मोर्चाचे वनविभागाला निवेदन


 

भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वाढता वावर नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. शेतपरिसर, पाणवठे तसेच रस्त्यांवर बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी, गुराखी, शाळेत जाणारी लहान मुले व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भोर तालुका (उत्तर) यांच्यावतीने वनपरिक्षेत्र कार्यालय, नसरापूर येथे तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

भोर–राजगड–मुळशीचे कार्यसम्राट मा. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यातील खोपी, कुसगाव, कांजळे, वर्वे, करंदी, तांभाड, माळेगाव आदी गावांमध्ये बिबट्याचे सतत दर्शन होत असून त्यामुळे मानवी व पशुधन सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनामध्ये बिबट्याच्या वाढत्या हालचालींची दखल घेऊन पिंजरे लावणे, वनकर्मचाऱ्यांची नियमित गस्त वाढवणे, रात्रीच्या वेळी संवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता घेणे, तसेच बिबट्यापासून संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने हे निवेदन कार्यालयातील लिपिक सुनील माळवे यांच्याकडे देण्यात आले. वनपरीक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेब यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून तात्काळ योग्य त्या कार्यवाहीची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा भोर तालुका अध्यक्ष विशाल डिंबळे,निलेश भोरडे (मा. सरपंच, वर्वे), शुभम यादव, गणेश कोंढाळकर, अक्षय डिंबळे, तुषार भोरडे, आर्यन खुटवड, लक्ष्मण पवार आदी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भोर तालुक्यातील नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असताना वनविभागाने तातडीने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!