आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नसरापूर गणात काँग्रेसचा ‘जुना निष्ठावंत’ पुन्हा मैदानात; लवकरच उमेदवारीची अधिकृत घोषणा! भाजप-राष्ट्रवादीच्या वाऱ्यात काँग्रेसचा चेहरा ठरणार ‘जड’; जनतेत उत्सुकता वाढली


नसरापूर परिसरातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, काँग्रेस पक्षाकडून नसरापूर गणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. नसरापूर भागातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि निष्ठावंत काँग्रेस नेत्याला लवकरच पंचायत समिती नसरापूर गणातून उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, हा नेता नसरापूर भागातील प्रत्येक नागरिकाला परिचित असून “काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा” म्हणून जनतेत ओळखला जातो.

गेल्या काही काळापासून नसरापूर आणि आसपासच्या भागात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसत असले, तरी काँग्रेस पक्ष आता नव्या रणनीतीने मैदानात उतरल्याचे संकेत मिळत आहेत. “नवीन उमेदवार पण जुना निष्ठावंत” या संकल्पनेतून काँग्रेस पक्ष नसरापूर गणात पुन्हा एकदा ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.

जनतेत उत्सुकता, काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य

या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेमुळे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून नियोजनबद्ध तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. नसरापूर भागातील नागरिकांमध्येही या नेत्याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, “यावेळी काँग्रेसचा अनुभवी चेहरा मैदानात आला तर राजकीय समीकरणे बदलू शकतात” अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

भाजप-राष्ट्रवादीला ठरू शकतो ‘डोकेदुखीचा’ विषय

राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसकडून जर या ज्येष्ठ व निष्ठावंत नेत्याला अधिकृत उमेदवारी जाहीर झाली, तर भाजप व राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांसाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरू शकते. स्थानिक पातळीवर सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि दीर्घकालीन निष्ठा असलेला नेता निवडणुकीत उतरल्यास, त्याचा थेट फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लवकरच तिकीट जाहीर होण्याची शक्यता

काँग्रेस पक्षाकडून पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू असून नसरापूर गणातील उमेदवारीबाबत अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींकडून सकारात्मक संकेत मिळत असून, अधिकृत घोषणा झाल्यानंतर नसरापूर भागातील राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून या उमेदवाराच्या प्रचाराची प्राथमिक दिशा निश्चित होत असून, नसरापूर गणातील विकासकामे, जनतेचे प्रश्न, मूलभूत सुविधा, युवकांचे प्रश्न तसेच शेतकरी व कामगार वर्गाच्या अपेक्षा या मुद्द्यांवर भर देत निवडणुकीत उतरायची तयारी सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.

नसरापूर गणातील निवडणूक आता “एकतर्फी” न राहता “खऱ्या अर्थाने रंगतदार” होणार असल्याचे चित्र दिसत असून, काँग्रेसचा हा संभाव्य निर्णय भाजप-राष्ट्रवादीच्या रणनीतीला धक्का देणारा ठरेल, अशी चर्चा जनतेतून पुढे येत आहे.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!