आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पुणे–सातारा महामार्गालगत अवैध अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश राजगड पोलीस स्टेशनची धडक कारवाई; १९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


 

पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गालगतच्या काही गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध अंमली पदार्थांच्या धंद्यांवर राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रभावी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. मौजे गाऊडदरा (ता. हवेली, जि. पुणे) येथे गांजा व हाशिशसदृश अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गाऊडदरा गावातील चाटे शाळेच्या पाठीमागे असलेल्या शिंदे वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुष्पा शिंदे (पूर्ण नाव माहित नाही, रा. गाऊडदरा, ता. हवेली, जि. पुणे) हिच्यासह दोन अनोळखी पुरुष हे अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने आपल्या ताब्यात पदार्थ बाळगत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी गांजासदृश पदार्थाच्या चार पुड्या तसेच हाशिशसदृश तपकिरी रंगाचा घट्ट पदार्थ असलेले एकूण तीन बॉक्स जप्त केले. या बॉक्समध्ये लहान डब्यांमध्ये अंमली पदार्थ ठेवण्यात आले होते. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत १९,५०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाईत पोलीस हवालदार आडवाल यांनी अंमलबजावणीची भूमिका बजावली, तर तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्याकडे असून, ही कारवाई राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

महत्त्वाचा मुद्दा :

ही कारवाई कौतुकास्पद असली तरी पुणे–सातारा महामार्गावरील काही गावांमध्ये अजूनही अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. महामार्गालगतची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता काही समाजकंटक या मार्गाचा गैरफायदा घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अवैध धंद्यांवर राजगड पोलिसांनी लवकरात लवकर ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करून पूर्णपणे आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

राजगड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने अशीच कठोर भूमिका कायम ठेवल्यास महामार्गालगतच्या भागातून अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!