इंदापूर प्रतिनिधी : सागर जगदाळे भिगवन
संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी तसेच सध्या ठिकठिकाणी अपूर्ण व बंद अवस्थेत असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी ठाम मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. १७) ना. गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर पत्र दिले. या भेटीवेळी अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.
संत तुकाराम महाराज पालखी (राष्ट्रीय महामार्ग ९६५-जी) मार्गावरील श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर दरम्यान भवानीनगर–इंदापूर–सराटी या सुमारे ७० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. या मार्गावरील कामे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची असून त्याचा फटका थेट वारकरी, प्रवासी व स्थानिक नागरिकांना बसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दर्जेदार काम करून घेण्यात यावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
पालखी मार्गावरील निमगाव केतकी व बावडा बाह्यवळण रस्ता, वकीलवस्ती येथील भुयारी मार्ग, वडापुरी येथील उड्डाणपूल तसेच तरंगवाडी, लासुर्णे, भवानीनगर–सणसर आदी ठिकाणची रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करावीत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. तसेच इस्टिमेटनुसार वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक आदी कामे अनेक ठिकाणी झालेली नसल्याचेही पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे. गटारींची कामे अपूर्ण अथवा अस्तित्वात नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावर्षी जुलै महिन्यात पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असताना अनेक ठिकाणी वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सुरवड येथे तर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालखी रथ जाणाऱ्या गावागावातील सेवा रस्ते रुंद व दर्जेदार करण्यात यावेत, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
पालखी मार्गाची कामे अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू करण्यात आल्याबाबतही पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करारानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करावी, तोपर्यंत टोल आकारू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. अपूर्ण व निकृष्ट कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडून नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आगामी पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी तातडीने बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यावेळी पालखी मार्गावरील निकृष्ट कामांची चौकशी करून अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत संबंधितांना तातडीचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन ना. गडकरी यांनी दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.










