राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थांच्या धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा गुन्हे घडत असल्याने प्रशासनालाही अखेर खडबडून जाग आली आहे. काही दिवसांपूर्वी ज्या गाऊडदरा गावातील चाटे शाळेच्या पाठीमागील शिंदे वस्ती परिसरात गांजा विक्रीप्रकरणी कारवाई झाली होती, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अवैध गांजा साठवणूक व विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे.
आधीच्या कारवाईत गांजा व हाशिशसदृश पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र त्या घटनेनंतरही या परिसरात अवैध धंदे सुरूच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.२५ वाजण्याच्या सुमारास राजगड पोलिसांनी याच शिंदे वस्ती परिसरात धडक छापा टाकत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत सौरभ श्रीरंग शिंदे (वय १९, शिक्षण) व सुरज सुभाष डिंबळे (वय २२, मेस डबे व्यवसाय), दोघेही रा. गाऊडदरा, ता. हवेली, जि. पुणे, यांना ताब्यात घेण्यात आले. सचिन सुभाष शिंदे यांच्या मालकीच्या खोलीत गांजासदृश पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी तब्बल ८८४ ग्रॅम वजनाचा गांजासदृश पदार्थ, लहान व मोठ्या पुड्यांमध्ये साठवलेला जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत १६ हजार रुपये इतकी आहे.
एकाच ठिकाणी पुन्हा गुन्हा – गंभीर बाब
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गांजा व अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना, पुन्हा त्याच परिसरात अवैध व्यवहार सुरू असल्याचे समोर आल्याने राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे किती मजबूत आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ आरोपी बदलतात, मात्र धंदे मात्र सुरूच राहतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
महामार्गालगतची गावे ‘सेफ झोन’ बनतायत का?
पुणे–सातारा महामार्गालगतची गावे या अवैध धंद्यांसाठी सोयीस्कर ठिकाणे बनत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे. महामार्गाची जवळीक, सततची वाहतूक आणि आडवाटांचा वापर करून समाजकंटक हे धंदे चालवत असल्याचे चित्र आहे. याचा सर्वात मोठा फटका तरुण पिढीला बसत असून, सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
प्रशासनाला थेट इशारा
सलग गुन्हे उघडकीस येत असताना केवळ एका-दोन कारवायांवर समाधान मानणे धोकादायक ठरणार आहे. राजगड पोलीस स्टेशनच्या संपूर्ण हद्दीत जे काही अवैध धंदे सुरू आहेत, त्यांच्यावर विशेष मोहीम राबवून एकाचवेळी व्यापक रेड मारणे अत्यावश्यक आहे. किरकोळ विक्रेते नव्हे, तर या धंद्यांचे सूत्रधार, साठवणूक करणारे आणि पुरवठा साखळी तोडण्याची गरज आहे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
राजगड पोलिसांच्या सलग कारवायांमुळे निश्चितच सकारात्मक संदेश गेला आहे. मात्र आता वेळ आली आहे ती निर्णायक, सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाईची. अन्यथा एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा घडणारे असे गुन्हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राहतील, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.







