आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

गाव चावडीवर उमेदवार ठरवण्याची मोठी चर्चा नसरापूरचा एकजुटीचा निर्धार : “एकच उमेदवार, एकच विजय!”


नसरापूर प्रतिनिधी : विलास धोंगडे

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागताच नसरापूर गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गाव चावडीवर गेल्या काही दिवसांपासून सलग चर्चा, बैठका आणि विचारमंथन सुरू असून, गावकऱ्यांमध्ये यंदा एकजुटीने लढण्याचा ठाम निर्धार दृढ होताना दिसत आहे.

 

वेळूगणातील विविध गावांतून अनेक इच्छुक उमेदवार तयारीत असताना, नसरापूर गाव मात्र यंदाच्या निवडणुकीत एकसंघ राहण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत नसरापूरच्या उमेदवाराचा अल्प मतांनी झालेला पराभव ग्रामस्थ विसरलेले नाहीत. त्याच अनुभवातून शिकत यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती — दोन्ही ठिकाणी नसरापूर गावातून एकच उमेदवार उभा राहावा, असा एकमुखाने निर्णय ग्रामस्थांकडून व्यक्त होतो आहे.

 

गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, महिला व स्थानिक पदाधिकारी यांचा एकच सूर — “नसरापूरच्या मतांचा एकसंध पाठींबा मिळाला तर आपला उमेदवार नक्कीच विजय मिळवेल.” त्यामुळे उमेदवार ठरवण्यास विलंब न करता, ग्रामसभेच्या माध्यमातून लवकरच अधिकृत नाव जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

 

नसरापूरमधील बलाढ्य नेतेमंडळींनी यापूर्वी केवळ ग्रामपंचायत मर्यादेत राजकारण केले असले तरी, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती या उच्चस्तरीय निवडणुकांत गावाचे प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज सर्वांनी मान्य केली आहे. गावाने एकजुटीने उभे राहिल्यास पुढील काही वर्षांच्या विकासनिर्णयात नसरापूरचा आवाज अधिक ठळकपणे उमटू शकतो, अशा अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

 

चावडीवरील या चर्चांमधून एकच निष्कर्ष समोर आला आहे — “गाव एकत्र, निर्णय एक, उमेदवार एक आणि विजयही एक!”

आता गावकऱ्यांचे लक्ष नसरापूरच्या अधिकृत उमेदवार घोषणेकडे लागले असून, त्यावर आगामी निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!