आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर वन विभागाकडून जाळरेषा कामास सुरुवात रोहिडा (विचित्रगड) डोंगर परिसरात वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना


भोर | प्रतिनिधी : तबरेज खान

डोंगराळ भागात दरवर्षी वाळलेले गवत, पालापाचोळा व झुडपांना लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा गैरसमज, निष्काळजीपणा किंवा मानवनिर्मित कारणांमुळे वणवे पेट घेतात. यामध्ये संपूर्ण डोंगररांगा, जंगल क्षेत्र जळून खाक होत असून मौल्यवान वनसंपदा नष्ट होते. यासोबतच अनेक पशु-पक्षी व वन्यप्राणी होरपळून मृत्युमुखी पडतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वणवे नियंत्रणात ठेवण्यासाठी भोर तालुक्यातील रोहिडा (विचित्रगड) डोंगर परिसरात वन विभागाच्या वतीने जाळरेषा तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

रोहिडा किल्ला परिसरातील डोंगररांगांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वणव्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे येथील नैसर्गिक परिसंस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीचा फटका बसत असतानाच वणव्यांमुळे या भागातील वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आले आहेत. परिणामी वन्यप्राणी व पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याचेही निरीक्षणात आले आहे.

वन विभागाच्या वतीने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली असून लावलेली रोपे सुरक्षित राहावीत, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या आगीचा वनक्षेत्रावर व रोपांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जाळरेषा टाकण्यात येत आहेत. या जाळरेषांमुळे वणव्यांचा प्रसार थांबविण्यास मदत होणार असून वनसंपदेचे संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे.

ही कारवाई भोरचे सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी वनरक्षक के. एम. हिमोणे यांच्यासह हंगामी वनसेवक गणेश बोडरे, अविनाश चव्हाण, संपत बोडरे, धैर्यशील चव्हाण, साहिल चव्हाण आदी वन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

दरम्यान, रोहिडा किल्ला परिसरातील वनक्षेत्र हे संवेदनशील असून नागरिकांनी या भागात वावरताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. वणवे लावणे किंवा आग लावण्यासारख्या कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे. वन्यजीव व निसर्गाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन वनपाल सुग्रीव मुंडे यांनी केले आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!