भिगवण | प्रतिनिधी सागर जगदाळे
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात उजनी धरणाच्या संपादित व पाणलोट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाकडून कडक कारवाई करण्यात आली. उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात अतिक्रमण करून काहींनी वीटभट्या, घरे तसेच व्यावसायिक स्वरूपाची दुकाने उभारली होती. याबाबत वेळोवेळी नोटीसा देऊनही अतिक्रमण हटविण्यात न आल्याने आज शनिवारी (दि. ३) रोजी धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली.
अधिक माहितीनुसार, भिगवण–राशीन रोडलगत जुन्या भिगवण गावठाणाजवळ ही कारवाई करण्यात येत असून, या कारवाईत वीटभट्या, घरे तसेच दुकाने पाडण्यात आली. उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रातील वाढती अतिक्रमणे पाणी साठवण क्षमता, जलव्यवस्थापन आणि सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी असल्याने जलसंपदा विभागाने कठोर भूमिका घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या अतिक्रमणांबाबत यापूर्वीही कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. गतवर्षी जलसंपदा विभागाच्या पळसदेव भीमा उपसा सिंचन शाखेचे उपविभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांच्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस ठाण्यात अतिक्रमणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. खाडे यांनी भिगवण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अतिक्रमणांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने अखेर प्रशासनाने थेट धडक कारवाईचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
उपलब्ध मालमत्तेचे जास्त नुकसान होऊ नये तसेच अनावश्यक तोडफोड टाळण्यासाठी यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीसा देऊन अतिक्रमण स्वखर्चाने हटविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने आज प्रत्यक्ष कारवाई करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
उजनी धरण हे राज्यातील महत्त्वाचे जलसाठा प्रकल्प असल्याने त्याच्या संपादित व पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत जलसंपदा विभागाकडून देण्यात आले आहेत.








