आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

शाळांच्या परिसरात तंबाखू विक्रीविरोधात व्यापक मोहीम एकाच दिवशी अनेक ठिकाणी कारवाई; राजगड पोलिसांची ठोस व परिणामकारक कामगिरी


 

भोर तालुक्यातील शाळा व शिक्षणसंस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलीस स्टेशन यांच्या वतीने दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत व्यापक तपास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शिंदेवाडी, ससेवाडी फाटा तसेच वेळू या गावांमध्ये एकाच दिवशी सलग कारवाई करून अनेक पानटपऱ्या, हॉटेल्स व किराणा दुकाने तपासण्यात आली.

शिंदेवाडी गावच्या हद्दीत भारती विद्यापीठ शाळेच्या परिसरात तपासणी करत असताना संशयित आरोपी सागर साहेबराव शिंदे हा पानटपरी व्यवसायातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच परिसरात ससेवाडी फाटा येथे वेगवेगळ्या वेळेत केलेल्या कारवाईत निखील प्रकाश गोगावले तसेच लक्ष्मण बाळु गोगावले हे संशयित आरोपी शाळेजवळील परिसरात तंबाखू व सिगारेटची विक्री करताना आढळले.

याच दिवशी वेळू गावच्या हद्दीत जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणि आसपास तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत किराणा दुकान व इतर व्यवसायातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे सारीका संभाजी पांगारे, सोनाली सचिन खुंटे, संतोष तानाजी पांगारे तसेच देवा राम पटेल हे संशयित आरोपी पोलिसांच्या निदर्शनास आले. शाळेच्या अगदी जवळ विद्यार्थ्यांसाठी प्रतिबंधित असलेल्या परिसरातच ही विक्री सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या सर्व कारवायांमध्ये विविध प्रकारचे तंबाखू, सिगारेट, बिडी, पानमसाला आदी पदार्थ जप्त करण्यात आले. शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता तात्काळ कारवाई केली.

संपूर्ण मोहिमेची कायदेशीर प्रक्रिया पोलीस कॉन्स्टेबल गणेश पंढरीनाथ साळुंके व अमोल बबन शेडगे यांच्या फिर्यादीवरून पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस हवालदार मुंढे यांनी सक्रिय सहभाग घेतला, तर पुढील तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही संपूर्ण मोहीम प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

राजगड पोलिसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शाळा, महाविद्यालये व शिक्षणसंस्थांच्या परिसरात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या विक्रीला अजिबात माफ केले जाणार नाही. भविष्यातही भोर तालुक्यातील सर्व शाळा परिसरात नियमित तपासणी करून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने राजगड पोलिसांनी राबविलेली ही व्यापक मोहीम सामाजिक जाणीव आणि कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण ठरत असून, पालक, शिक्षक व नागरिकांकडून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!