आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

शेटफळगडे नजीक उभ्या ऊस ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, ऊसतोड हंगामातील सहावा बळी; पोलिस व आरटीओंच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा रोष


प्रतिनिधी सागर जगदाळे भिगवन 

शेटफळगडे (ता. इंदापूर) परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऊस ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात संतोष नारायण हिरवे (वय ५१, रा. शरद नगर, तांदूळवाडी, ता. बारामती) यांचा मृत्यू झाला. ऊसतोड हंगामातील हा सहावा बळी ठरल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ऊस ट्रॅक्टर-ट्रॉली(एमएच४५एडी ५२६५)रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर, चेतावणी दिवे अथवा अन्य कोणतीही सुरक्षिततेची साधने लावलेली नव्हती. अंधारात ट्रॉली लक्षात न आल्याने दुचाकीस्वार(एम एच 42 ई ९२२५) थेट ट्रॉलीवर आदळला. धडक इतकी भीषण होती की संतोष हिरवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ॲम्बुलन्सच्या माध्यमातून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी भिगवण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर पोलिस व आरटीओ प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भिगवण परिसरात आरटीओची चारचाकी गाडी नियमितपणे रस्त्यांवर फिरताना दिसते; मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींबाबत ठोस व प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

त्याचप्रमाणे, अनेक ठिकाणी असा प्रकार सर्रास पाहायला मिळतो की एका ट्रॅक्टर-ट्रॉलीचे पासिंग असतानाही तोच नोंदणी क्रमांक अनेक ट्रॉलींना वापरला जातो. प्रत्येक ट्रॉलीसाठी स्वतंत्र परवाना व नोंदणी आवश्यक असतानाही, एकाच नंबरवर अनेक ट्रॉली रस्त्यावर धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे अपघात घडल्यास जबाबदारी निश्चित करण्यात अडचणी येतात, तसेच कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप केला जात आहे.

 

सामान्य दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर तत्काळ कारवाई करणारे अधिकारी ऊस ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या बाबतीत मात्र मौन बाळगत असल्याचे दिसून येते. वेळेत कठोर तपासणी, नियमांची अंमलबजावणी व कारवाई झाली असती, तर हा बळी टाळता आला असता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या अपघातास जबाबदार घटकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!