आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर तालुक्यात ‘पक्षांचा बाजार’! निष्ठेपेक्षा वर्चस्वाला महत्त्व; विकासाचे मुद्दे मात्र कोपऱ्यात…


भोर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. मात्र या हालचालींमध्ये विकासाचा अजेंडा कमी आणि तिकीटबाजीचा खेळ जास्त दिसून येत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोण निष्ठा जपण्यासाठी धडपडतोय, तर कोण आपले वर्चस्व दाखवण्यासाठी पक्ष बदलतोय—अशी स्थिती निर्माण झाली आहे. आज भोर तालुक्यात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तिकीट मागणे, फॉर्म भरणे, गटबाजी करणे याला उधाण आले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढत चालला आहे.

विकासाचे मुद्दे बाजूला, तिकीट मिळवण्याची धडपड पुढे

निवडणुका लागल्या की प्रत्येक उमेदवाराच्या मनात “विकास करायचा” हा शब्द ऐकू येतो. पण नक्की विकास कसला? असा प्रश्न आज जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. कारण भोर तालुक्यात अजूनही अनेक मूलभूत समस्या तशाच आहेत.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था, वेळेवर लाईट नसणे, हॉस्पिटल व आरोग्यसेवेच्या समस्या, सांडपाण्याचा प्रश्न, महिला सक्षमीकरण, तसेच तरुणांसाठी रोजगार हे मुद्दे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

मात्र हे विषय आता राजकारणाच्या केंद्रस्थानी न राहता कुठेतरी दुर्लक्षित कोपऱ्यात पडले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

“विकासासाठी उमेदवार नाहीत, स्वतःच्या विकासासाठी उमेदवारी”

सध्या निवडणूक मैदानात उतरू पाहणाऱ्या अनेक उमेदवारांबाबत जनतेमध्ये अशी चर्चा आहे की, काही जणांना तालुक्याचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास कसा होईल, याचीच अधिक चिंता आहे.

तिकीट कोणत्याही पक्षातून मिळाले तरी चालेल, फक्त लढायचेच—अशी मानसिकता वाढल्याचे बोलले जात आहे. परिणामी, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी मिळत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.

काही भागात ओळखही नाही, तरी तिकीट?

भोर तालुक्यात काही ठिकाणी असेही उमेदवार पुढे येत आहेत की ज्यांचा चेहरा स्थानिक भागात नीट ओळखलाही जात नाही, तरी त्यांना तिकीट मिळाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, वर्षानुवर्षे काम करणारे, जनतेत मिसळलेले आणि लोकांच्या प्रश्नांसाठी उभे राहणारे चेहरे काही ठिकाणी डावलले गेल्याची भावना आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया कमी आणि सत्तेचा सौदा अधिक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सर्वच पक्षांमध्ये तीच स्थिती?

नागरिकांच्या चर्चेनुसार ही परिस्थिती केवळ एका पक्षापुरती मर्यादित नाही. राष्ट्रवादी, भाजप तसेच इतर पक्षांमध्येही काही प्रमाणात तशीच गटबाजी, तिकीटासाठीची धडपड आणि ‘कोण जिंकू शकतो’ या गणितांवर आधारित निर्णय होत असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे सामान्य मतदारांच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता कुठे आहे? आणि खऱ्या अर्थाने विकासाचा आराखडा कोणाकडे आहे?

आता निर्णय जनतेच्या हातात!

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एक स्पष्ट संदेश उमटत आहे—

विकास करायचा की मागास राहायचं, हे आता जनतेने ठरवायचं आहे.

कोणाला संधी द्यायची आणि कोणाला घरचा रस्ता दाखवायचा, हा निर्णय मतदारांच्या हातात आहे.

ज्या उमेदवाराकडे फक्त पक्षांतराचा इतिहास आहे, पण कामाचा लेखाजोखा नाही—अशांना मतदारांनी प्रश्न विचारण्याची गरज आहे. तसेच गावाच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांनाच ताकद देण्याचा विचार जनतेतून पुढे येत आहे.

विकासाचा पाया कुणाच्या हातात द्यायचा?

भोर तालुक्याचा विकास हा केवळ घोषणा, पोस्टर आणि प्रचारापुरता मर्यादित न राहता रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, वीज, रोजगार या मूलभूत गरजांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

त्यामुळे या निवडणुकीत विकासाचा पाया कुणाच्या हातात द्यायचा, याचा विचार करूनच मतदान करणे ही काळाची गरज बनली आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!