खडकी (ता. भोर) गावामध्ये सरपंच पदासाठी झालेली पोटनिवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली. गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.
या निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. राहुल मोहन बांदल (चिन्ह – कपबशी) आणि अमित गोपीनाथ रांजणे (चिन्ह – रिक्षा) यांच्यात थेट लढत झाली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांची ये-जा सुरू होती.
या निवडणुकीत एक विशेष बाब लक्षवेधी ठरली. गावातील शेवंताबाई नागू रांजणे (वय ९२) यांनी वयाची पर्वा न करता व्हीलचेअरवर मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कृतीने गावात कुतूहल निर्माण झाले असून तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
आजच्या काळात काही जण निवडणुकीकडे सुट्टीचा दिवस म्हणून पाहतात, मात्र शेवंताबाईंच्या कृतीतून मतदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे किती आवश्यक आहे, याचा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, खडकी गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल रांजणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “राहुल बांदल हे गावातील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेतात. कोणतीही अडचण असो, ते तत्परतेने मदतीस धावून जातात. त्यामुळे त्यांचा दणदणीत विजय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या चुरशीच्या लढतीचा निकाल २९ तारखेला जाहीर होणार असून संपूर्ण गावाचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.






