आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विंझर–पानशेतच्या रणधुमाळीत शिवसेनेचा झंझावात! सहकारातील महामेरू आणि युवा नेतृत्वाचा ‘क्रांतिकारी’ संगम


विंझर | वार्ताहर : समीर कांबळे

राजगड तालुक्याच्या राजकीय पटावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून, विंझर–पानशेत गटात यंदा लढत विशेष रंगतदार ठरत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) विद्यमान संचालक आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व श्री. रेवणनाथ (आण्णा) दारवटकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याने या गटातील समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे परिसरात सकारात्मक व परिवर्तनवादी राजकीय लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अनुभवी मार्गदर्शक, सक्षम संघटन

या निवडणुकीचे नियोजन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कुलदीप (तात्या) कोंडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाजीराव शेंडकर आणि तालुकाप्रमुख अंकुश चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे सुरू आहे. या दिग्गजांच्या सक्रिय भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून प्रचार यंत्रणा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे.

अनुभवाचा डोंगर, युवा जिद्दीची धार

जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेने श्री. अनंता रेवणनाथ दारवटकर यांच्या रूपाने सुशिक्षित, सुसंस्कृत आणि धडाडीचे युवा नेतृत्व मतदारांसमोर ठेवले आहे. वडिलांचा सहकारातील प्रदीर्घ अनुभव आणि पुत्राची आधुनिक विकासदृष्टी यांचा संगम मतदारांसाठी आश्वासक पर्याय ठरत आहे. जनसंपर्काची ताकद आणि अनुभवाचे पाठबळ यामुळे शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाल्याचे दिसते.

पंचायत समितीतही ‘वजनदार’ उमेदवार

जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेने प्रभावी फळी उभी केली आहे.

विंझर गण : येथून श्री. दिलीप महादेव रेणुसे यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे.

पानशेत गण : येथून सौ. स्नेहल शंकर ढेबे यांच्या रूपाने कार्यक्षम व अभ्यासू महिला नेतृत्व मैदानात उतरले असून, घराघरातील पोहोच ही त्यांची ताकद ठरत आहे.

‘काटे की टक्कर’ : विकासाचा महासंग्राम

विंझर–पानशेत खोऱ्यातील ही निवडणूक केवळ सत्तासंघर्षापुरती मर्यादित न राहता विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित होत आहे. प्रस्थापित राजकीय प्रवाहांपुढे सहकाराची शक्ती आणि युवा नेतृत्वाची उर्मी उभी ठाकल्याने येथे चुरशीची ‘काटे की टक्कर’ अपेक्षित आहे. वैयक्तिक टीकेऐवजी गावगाड्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत असल्याने सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

परिवर्तनाची साद, घराघरात शिवसेना

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचा प्रभाव आणि दारवटकर यांची लोकसंग्रहाची हातोटी यामुळे परिसरात भगवेमय वातावरण दिसून येत आहे. “आपल्या हक्काचा माणूस, आपल्या विकासाचा ध्यास” या भावनेतून मतदार धनुष्यबाण चिन्हाकडे आशेने पाहत असून, निकालाच्या दिवशी विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!