आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेल्ह्यात ‘एशियन क्रीडा करंडक २०२६’ उत्साहात पार पडला खो-खो, कबड्डीपासून धावणे-गोळाफेकपर्यंत ग्रामीण विद्यार्थ्यांचा दमदार क्रीडाविष्कार


वेल्हे | वार्ताहर

महेश सणस

 

वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘एशियन कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, वेल्हे’ यांच्या वतीने आयोजित ‘आंतरमहाविद्यालयीन एशियन क्रीडा करंडक २०२६’ स्पर्धा नुकत्याच तोरणा महाविद्यालय मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. ग्रामीण विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांतून आपली गुणवत्ता, शिस्त आणि संघभावना दाखवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

 

या क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, गोळाफेक, १०० मीटर धावणे आणि कॅरम अशा स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. मैदानावर प्रत्येक स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळाले, तर खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेचे वातावरण अधिक रंगतदार केले.

 

दीपप्रज्वलनाने उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रीडा मैदान पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. अनिता साप्ते आणि सचिव श्री. अनिल साप्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी तोरणा विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर व सांगळे सर यांनी मार्गदर्शन करत खेळाचे शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि सातत्य यावर भर दिला.

 

दुर्गम भागात शिक्षणासोबत खेळालाही प्राधान्य

 

एशियन कॉलेज वेल्हेच्या प्रभारी प्राचार्या प्रा. स्वाती काळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. वेल्हेसारख्या दुर्गम भागात शिक्षणाची संधी निर्माण करताना येणाऱ्या अडचणी असूनही, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत कौशल्य विकास आणि खेळाचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विजेत्यांचा गौरव, खेळाडूंना प्रेरणादायी सन्मान

 

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी स्पर्धेतील विजेत्या संघांना व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र, सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. अनिता साप्ते यांनी शिक्षणासोबत खेळाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.

 

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

 

या वेळी डॉ. अनिता साप्ते, श्री. अनिल साप्ते, डॉ. सविता सिंग (प्राचार्या, एशियन कॉलेज धायरी), प्राप्ती देसाई (प्राचार्या, एशियन फार्मसी कॉलेज) तसेच तोरणा विद्यालयाचा शिक्षकवृंद आणि एशियन कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, संघभावना आणि सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा क्रीडा करंडक उत्साहात पार पडला. शेवटी मान्यवरांचे आभार मानून आणि विजेत्यांना शुभेच्छा देत या क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!