सागर जगदाळे
भिगवण (ता. इंदापूर)
भिगवण-राशीन रोडवर राजपुरे पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (दि. 13 जानेवारी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात अतुल बाबूलाल गजरमल (वय 38, रा. काञज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्विफ्ट कारमधील विजय हनुमंत शिंदे (वय 38) व दादासो सर्जेराव डुबे (वय 35, दोघे रा. काञज, ता. करमाळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह असलेल्या ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कारची राजपुरे पेट्रोलपंपाजवळ जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारचा मोठ्या प्रमाणावर चेंदामेंदा झाला.
घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतुल गजरमल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून ट्रॅक्टर चालकाविरोधात पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पंचनामा व चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ भिगवण-राशीन रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सतत होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










