भिगवण : प्रतिनिधी : सागर जगदाळे
देशात सुरू असलेल्या गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेचा दर प्रतिक्विंटल सुमारे ३,८५० रुपये होता. मात्र सध्या या दरात जवळपास ३०० रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याने साखर उद्योग गंभीर अडचणीत सापडला आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिले देणे कारखान्यांना अवघड बनले असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर साखरेचा किमान विक्री दर (MSP) प्रति किलो ४१ रुपये करावा तसेच इथेनॉलच्या विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लवकरच राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ संबंधित मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सध्या देशभरात ऊस गळीत हंगाम वेगात सुरू आहे. मात्र साखर व इथेनॉल या दोन प्रमुख उत्पन्न स्रोतांमधून मिळणारा महसूल अपुरा ठरत असल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊस बिले १४ दिवसांत अदा करण्यास अडचणी येत आहेत. परिणामी अनेक कारखान्यांना बँकांकडून वाढीव कर्ज घ्यावे लागत असून, व्याजाच्या ओझ्याखाली दबले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये हेच चिंताजनक चित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारकडून भेटीची तारीख निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील प्रतिनिधींचा समावेश असलेले शिष्टमंडळ वस्तुस्थितीनिष्ठ अधिकृत आकडेवारी सादर करून केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे.
साखर (नियंत्रण) आदेश, 2025 च्या कलम ९ नुसार साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये उसाची एफआरपी, रूपांतरण खर्च व उप-उत्पादनांमधून मिळणारा महसूल यांचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या उसाच्या उत्पादनाचा सरासरी खर्च (तोडणी व वाहतुकीसह) प्रति टन ४,००० रुपयांपेक्षा अधिक आहे, तर साखरेची सरासरी विक्री किंमत प्रति क्विंटल सुमारे ३,६०० रुपये इतकी आहे. या तफावतीमुळे कारखान्यांवर आर्थिक ताण वाढून शेतकऱ्यांच्या देयकांमध्ये विलंब होत आहे.
याआधी साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ३१ रुपये निश्चित झाल्यानंतर उसाची एफआरपी २,७५० रुपये प्रति टनावरून ३,५५० रुपये इतकी वाढली असून, ही वाढ सुमारे २६ टक्के आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान एक्स-मिल साखरेचे दर ३८ ते ४० रुपये आणि किरकोळ दर ४६ ते ४७ रुपये प्रति किलो होते, ते ग्राहकांनी कोणतीही तक्रार न करता स्वीकारले. त्यामुळे किमान विक्री दर ४१ रुपये प्रति किलो करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
इथेनॉल दरांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मागील दरवाढीनंतर उसाच्या एफआरपीमध्ये सुमारे १६ टक्के वाढ झाली असली तरी इथेनॉलच्या किमती मात्र स्थिर आहेत. उसावर आधारित कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ करावी तसेच साखर व धान्यावर आधारित इथेनॉलसाठी न्याय्य दररचना ठेवावी, अशी मागणीही केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. सध्याचे आंतरराष्ट्रीय साखरेचे दर ४१० ते ४३० डॉलर्स प्रति टन (एफओबी) असल्याने निर्यात फारशी परवडणारी नसली तरी जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत चांगल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या काळात ब्राझीलची साखर निर्यात मर्यादित असल्याने देशातील अतिरिक्त साठा लक्षात घेता आणखी ५ लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीस परवानगी देऊन ती एनसीईएलमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही महासंघाच्या वतीने करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.







