राजगड प्रतिनिधी : समीर कांबळे
भोर तालुक्यातील कुंबळे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रामदैवत कुंबळजाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव १ आणि २ जानेवारी रोजी अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
यात्रेच्या निमित्ताने कुंबळजाई देवीची विधीवत पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच रात्री आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी ग्रामस्थांचे मनोरंजन केले.

कुस्तीचे जंगी मैदान आकर्षण
यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे कुस्तीचे जंगी मैदान. या मैदानात पंचक्रोशीतील तसेच राज्यातील नामवंत राष्ट्रीय मल्लांनी आपला सहभाग नोंदवला. कुस्ती शौकिनांच्या अलोट गर्दीने हे मैदान फुलून गेले होते. चित्तथरारक कुस्त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या कुस्ती मैदानासाठी राष्ट्रीय मल्ल व प्रसिद्ध पंच वस्ताद तुषार गोळे आणि लखन पवार (वेल्हे) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कुस्त्यांनी खेळाडूंमध्ये नवा उत्साह भरला.
ग्रामस्थांचा मोठा सहभाग
कुंबळे गावच्या या परंपरेत गावातील आबालवृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला. यात्रेचे नेटके नियोजन कुंबळे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. शांतता आणि शिस्तीत पार पडलेल्या या उत्सवामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.








