आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खानापूरमधील सराफ दुकानावरील दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; पुणे ग्रामीण पोलिसांची ४८ तासांत मोठी कामगिरी ५६ तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने हस्तगत; दोन आरोपी अटक, तीन विधिसंघर्षित बालकांचा सहभाग उघड


 

हवेली तालुक्यातील खानापूर गावात भर दिवसा सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत सुमारे ५६ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत ७० लाख ३२ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास खानापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर पाच अनोळखी दरोडेखोरांनी हातात तलवार व कोयते घेऊन दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला. दुकानातील मालक व महिला कामगारांना शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सुमारे ८४ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण १ कोटी ५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणी दुकान मालकाच्या पत्नी सौ. राणी अमोल बाबर (वय २८ वर्षे, व्यवसाय – सराफ दुकान, रा. खानापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवेली पोलीस स्टेशन गु.र.नं. १३०/२०२५ अन्वये बीएनएस कलम २१०(२) व आर्म्स अ‍ॅक्ट कलम ४ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने खानापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल व अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलीस स्टेशन व वेल्हे पोलीस स्टेशन यांची मिळून एकूण सहा तपास पथके तयार करण्यात आली.

साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोर दरोडा टाकल्यानंतर पानशेत–वेल्हेच्या दिशेने पसार झाल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन मोटारसायकलींचा माग काढत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

सलग दोन दिवस दिवस-रात्र शोधमोहीम राबवून तपास पथकांनी दरोडेखोर वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगर परिसरातील जंगलात लपल्याचे निष्पन्न केले. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी

अंकुश दगडू कचरे (वय २०, व्यवसाय – चालक, सध्या रा. कात्रज, पुणे, मुळ रा. सिंगापूर मोहरी, ता. वेल्हे)

गणेश भांबु कचरे (वय २२, रा. कात्रज, पुणे, मुळ रा. हारपुड, ता. वेल्हे)

या दोन आरोपींना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी हा दरोडा तीन विधिसंघर्षित बालकांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता तसेच ५६ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. ५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अंकुश कचरे याच्यावर यापूर्वीही शरीरविरोधी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनीलकुमार पुजारी (हवेली विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र मायने, तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे मार्गदर्शन यांच्या देखरेखीखाली पार पडली.

या यशस्वी कारवाईत

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,

हवेली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील,

सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते,

सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते,

तसेच पोलीस अंमलदार रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष तोडकर, संतोष भापकर, युवराज सोमवंशी, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, राहुल पवार, साबळे, संदीप वारे, भारत मोहोळ, अक्षय नवले, दीपक गायकवाड, विजय कांबळे, रोहित मरभळ,

पोलीस पाटील गणेश सपकाळ,

चालक सोमनाथ नाधव

यांनी विशेष परिश्रम घेतले.

भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकून पोलिसांना आव्हान देणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करून पुणे ग्रामीण पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!