आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोरमध्ये अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई रामबाग चौकात सापळा; ट्रकसह जळावू लाकूड जप्त, चालकावर गुन्हा दाखल


 

भोर | प्रतिनिधी : तबरेज खान

 

भोर तालुक्यात जळावू लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वनविभागाने धडक कारवाई करत ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. रामबाग येथील चौकामध्ये सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत ट्रकसह मोठ्या प्रमाणात जळावू लाकूड जप्त करण्यात आले आहे.

 

भोर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती शितल राठोड यांना भोर–शिरवळ मार्गावरून विनापरवाना जळावू लाकडाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार रामबाग चौकात सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संशयित ट्रक (क्र. MH 12 FZ 9211) तपासणीसाठी थांबवण्यात आला असता, ट्रकमध्ये विनापरवाना वृक्षतोड करून आणलेले जळावू लाकूड भरले असल्याचे आढळून आले.

 

या प्रकरणी संतोष शेडगे (रा. भोरेश्वर नगर, भोर) या संशयित ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर वन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ट्रक व त्यातील जळावू लाकूड वनविभागाने जप्त केले आहे.

 

ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक भोर शितल राठोड यांच्या सूचनेनुसार वनरक्षक के. एम. हिमोणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

भोर तालुक्यात काही ठिकाणी अद्यापही बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. अशा ठिकाणीही वनविभागाने लक्ष देत कठोर कारवाई करावी, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि वनसंपत्तीचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे वनसंपत्तीचे रक्षण होईल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!