आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर नगरपरिषदेकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई; दोन टपऱ्या उचलल्या, वाहतूक सुरळीत


भोर प्रतिनिधी : तबरेज खान

 

भोर शहरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींच्या पार्श्वभूमीवर भोर नगरपरिषद प्रशासनाने शुक्रवारी (दि. १९) शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली असून दोन टपऱ्या उचलण्यात आल्या.

 

भोरची बाजारपेठ मोठी असली तरी वाढलेल्या अतिक्रमणांमुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना चालताना अडथळे निर्माण होत होते. विशेषतः सणासुदीच्या काळात बाजारपेठ वाहनांच्या गर्दीने भरून जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत होती. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने यापूर्वीही प्रयत्न केले; मात्र अतिक्रमणांमुळे ते यशस्वी ठरत नव्हते. अखेर बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर बाजारपेठेत वाहतूक अधिक सुरळीत झाल्याने ये-जा करताना होणारा त्रास कमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, बाजारपेठेतील अतिक्रमणे काढताना शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागांत समान पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

कारवाईदरम्यान नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

दरम्यान, पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. गजानन शिंदे यांनी सांगितले की, शुक्रवार (दि. १९) रोजी काढण्यात आलेली अतिक्रमणे पुन्हा ‘जैसे थे’ करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास पुढील दोन दिवसांत कडक भूमिका घेऊन तत्काळ कारवाई करण्यात येईल. नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!